10 वर्षांपासून ‘या’ गंभीर समस्येनं ग्रासले होते अनिल कपूर ! सर्जरी न करताच झाले बरे, सांगितला अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनिल कपूर यांनी जणू काही वयाला मातच दिली आहे. वय त्यांच्यासाठी केवळ एक संख्या बनली आहे. ते बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. अनिल कपूर कितीही फिट दिसत असले तरीही गेल्या 10 वर्षांपासून ते पायाशी संबंधित अकिलिस टेंडन नावाच्या समस्येसोबत लढत होते. आता त्यांनी विना सर्जरीच ही समस्या दूर केली आहे.

अनिल यांनी शुक्रवारी त्यांच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यातून त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्या डॉक्टरांचाही उल्लेख केला आहे ज्यांच्या मदतीनं ते सर्जरी न करताच ठिक झाले.

आपल्या पोस्टमध्ये अनिल कपूर लिहतात, “मी गेल्या 10 वर्षांपासून अकिलिस टेंडन या समस्येचा शिकार झालो होतो. जगभरातील डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, ही समस्या दूर केली जाऊ शकत नाही आणि मला सर्जरी करावी लागेल. परंतु डॉक्टर मुलर यांनी माझ्यावर चांगला उपचार केला आणि मला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मदतीनं सर्जरी न करताच मी ठिक झालो. मला आता व्यवस्थित चालता येतं. मी पुन्हा धावू लागलो आहे आणि आता स्किपिंगही आरामात करू शकतो.”

अनिल यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ते पागलपंती आणि मलंग अशा सिनेमात काम करताना दिसले आहेत. लवकरच आता ते अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरही असणार आहे. याशिवाय ते करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहेत.