अनिल परब शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क मंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने दसरा मेळाव्यानंतर राज्यभरात दमदारपणे राजकीय पावले टाकायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यानंतर संघटनेची बैठक घेऊन स्वबळाचा नारा दिला. तेवढ्यावरच न थांबता नव्या नियुक्त्यांनाही सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने जिल्हानिहाय संपर्कमंत्री नेमले आहेत. त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम हे नव्याने नेमलेले शिवसेनेचे संपर्कमंत्री करतील.

पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय संपर्कमंत्री नेमण्यासाठी उचललेले पाऊल संघटना बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना राजकीय बळ देण्यासाठी महत्त्वाचे राहील, संघटनेसाठी एका शक्तीमान व्यक्तीची गरज होती अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश बोडके यांनी व्यक्त केली.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील जुने, नवे शिवसैनिक एकत्र आणून त्यांना राजकीय बळ देण्याचे कांम परब यांना करावे लागेल. सव्वा वर्षाने पुणे महापालिका निवडणुका होणार असल्याने परब यांना पुण्यात अधिक लक्ष द्यावे लागेल.

You might also like