संतापजनक ! नागपूरमध्ये श्वानाचे डोळे फोडले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने मादी श्वानावर हल्ला करुन तिचे दोन्ही डोळे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती मार्गावर बोले पेट्रोल पंपाजवळ एक मादी श्वान रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे नागरिकांना दिसले. याबाबत माहिती समजताच पशुप्रेमी अभिषेक तुरक, समीर उके, प्रतीक अरोरा, साहील हे घटनास्थळी पोहचले. या श्वानाच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त वाहात होते. त्यांनी तातडीने श्वानाला घेऊ डॉ. गौरी कानटे यांच्या पशू दवाखान्यात नेले. याठिकाणी श्वानावर शस्त्रक्रिया करुन श्वानाचे दोन्ही डोळे काढावे लागले. त्यामुळे अंध झालेल्या श्वानाची जबाबदारी आता राइस टू टेल्स या संस्थेने घेतली आहे.

राइस टू टेल्स ही संस्था या श्वानाची देखभाल करणार आहे. या घटनेनंतर पशुकल्याण अधिकारी अंजली वैद्यार, ईश्वर पोतदार, निकिता बोबडे, प्रतीक अरोरा व अन्य पशुप्रेमी यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.

तक्रार करण्याचे आवाहन

मोकाट श्वान किंवा अन्य प्राण्यांना मारणे, जखमी करणे, त्यांना मारुन टाकणे यावर कायद्याने बंदी आहे. तसेच पशुप्रेमींना मारहाण करणाऱ्यालाही शिक्षा होऊ शकते. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षाचा कारावास व दंडाचा शिक्षेची तरतूद आहे. प्राण्यांवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन मानद पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने यांनी केले आहे.