पारनेर तहसील कार्यालयासमोर बांधली जनावरे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आज दुपारी तहसील कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील जनावरे तहसील कार्यालयासमोरच बांधली.
गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यात तीव्र चाराटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. मागील आठवड्यात निलेश लंके प्रतिष्ठानने तहसीलदार गणेश मरकड यांना लेखी निवेदन देऊन चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासकीय पातळीवर चारा छावण्या सुरू करण्याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी दुपारी पारनेर तहसील कार्यालयासमोर जनावरे बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले.
 पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात निलेश लंके, दादा शिंदे, बापू शिर्के, सुनील मुळे, कारभारी पोटघन आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.