‘सूर नवा ध्यास नवा’चा राजगायक ठरला अनिरुध्द जोशी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी सादर केली. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेला हा सुरेल प्रवास नुकताच संपला. या स्पर्धकांमधून अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर राहीले. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा.

या अंतिम सोहळ्याचा विजेता ठरला अनिरुध्द जोशी. महाअंतिम सोहळ्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते अंतिम विजेत्याला सुवर्ण कटयार देण्यात आली. अनिरुध्द जोशीला कलर्स मराठी वाहिनीतर्फे दोन लाख रुपये, मानाची कटयार मिळाली तसेच केसरी टूर्स तर्फे ऑस्ट्रेलियाचा दौरा तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला.