सांगली : समडोळीमध्ये भोंदू बाबाचा ‘पर्दाफाश’, अंनिस अन् पोलिसांनी केलं ‘स्टिंग ऑपरेशन’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाचा गुरुवारी भांडाफोड करण्यात आला. मिरज तालुक्यातील समडोळी येथे अंनिस आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून बाबाचे पितळ उघडे पाडले. उमर सुलतान मुजावर बाबा (वय 55) असे त्या भोंदू बाबाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत प्रवीण कोकरे यांनी फिर्याद दिली आहे. समडोळी येथे मुजावर बाबा गेल्या 30 वर्षांपासून बुवावाजी करत आहे. दर गुरूवारी आणि रविवारी त्याचा दरबार भरतो. त्याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार आली होती. अंनिस कार्यकर्त्यांनी स्वतः बाबाच्या दरबारात जाऊन तक्रारीची पडताळणी केली. त्यांनंतर अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात आणि प्रा. अमित ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा धनाले, त्रिशला शहा, धनश्री साळुंखे, डॉ. सविता अक्कोळे, प्रविण कोकरे, चंद्रकांत वंजाळे हे व्यथा घेवून बाबांच्या कडे गेले. कार्यकर्त्यांनी नसलेल्या अडचणी सांगितल्या. उद्योगात नुकसान होतंय, बायकोशी वारंवार खटके उडत आहेत, अशी गाऱ्हाणी प्रविण कोकरे यांनी बाबांना सांगितली. जवळच्या व्यक्तीनेच अन्नातून करणी केल्याचे बाबांनी सांगितले. त्यावर जबरी उपाय म्हणून दरबारात नऊ वाऱ्या करणे आवश्‍यक आहे, असे सांगितले.

तात्पुरते निवारण म्हणून अंगारा आणि हळदी कुंकवाच्या पुड्या दिल्या. कारखान्याच्या आणि घराच्या चारही कोपऱ्यावर ठेवायला सांगितल्या. पहिल्या भेटीत बाबाने पैशाची मागणी केली नाही. पुढच्या भेटीत मात्र पैशांची मागणी करायला सुरुवात केली. आज गुरूवार असल्याने पुन्हा बोलविण्यात आले होते. त्यानुसार अंनिस कार्यकर्ते आणि ग्रामीण पोलिस त्याठिकाणी गेले. करणी काढण्यासाठी अंगाराच्या पुड्या दिल्या. आणि 1 हजार 551 रूपये देणगीची मागणी मुजावर बाबाने केली.

त्यावेळी अंनिस आणि ग्रामीण पोलिसांनी तेथे स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी त्या बाबाचा भांडाफोड झाला. त्याला अटक करण्यात आली असून फसवणूकीसह जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, उपनिरीक्षक विष्णू माळी, संतोष माने, कपिल साळुंखे, सुनंदा लोहार, सचिन मोरे यांनी सहभाग घेतला.