एकनाथ खडसेंच्या आरोपावर अंजली दमानिया संतापल्या, म्हणाल्या – ‘तळपायाची आग मस्तकात गेली !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर आता खडसेंनी त्यांना झालेला त्रास बोलून दाखवला आहे. इतकंच नाही तर त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं नाव घेत खडसेंनी फडणवीसांवर आरोप केले. त्यामुळं आता अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आपण सविस्तर उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खडसे म्हणाले होते, “एका महिलेनं विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरूद्ध केली होती. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माझ्यावर आरोप लावला. त्यानंतर सांताक्रूज पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला. या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथील पोलीस निरीक्षकांनीच मला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करायला सांगितलंय. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे जाऊन यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी ती महिला रात्रभर गोंधळ घालत होती त्यामुळं गुन्हा दाखल करायला लावला. पुन्हा मागे घेऊयात असं त्यांनी मला सांगितलं. या प्रकरणामुळं माझी खूप बदनामी झाली. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरद्ध राजकारण केलं गेलं. म्हणून मी पक्षात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला” असंही ते म्हणाले.

खडसेंच्या आरोपामुळं अंजली दमानिया यांनी तळपायाची आग मस्तकात गेल्याचं म्हटलं आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, “एकनाथ खडसेंनी कालच्या पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं. यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला कारण तेव्हा मी घरी नव्हते आणि ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्ष ऐकलं नव्हतं. पण रात्री मी जेव्हा ऐकलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. आज सायंकाळी 4.30 वाजता म यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे.” असंही दमानियांनी सांगितलं.

You might also like