Facebook वाद चिघळला, पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अंखी दास यांनी दाखल केली धमकीची तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक अंखी दास यांनी धमकी संदर्भात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्या लोकांनी त्यांना धमकावले त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली असल्याचे अंखी दास यांचे म्हणणे आहे.

दरम्यान दक्षिण दिल्लीचे डीसीपी यांनी सांगितले की, फेसबुक इंडियाच्या सार्वजनिक धोरण संचालक अंखी दास यांच्याकडून तक्रार आली आहे आणि याप्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र डीसीपी म्हणाले की, अद्याप या प्रकरणात कोणतीही एफआयआर नोंदलेली नाही.

आखी दास यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ऑनलाइन पोस्टिंग/ आशयाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याला आणि हिंसाचाराला धोका आहे. तक्रारीत काही ट्विटर आणि फेसबुक हँडल्सचा उल्लेख केला आहे, जिथून त्यांना धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी त्वरित एफआयआरची नोंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अंखी दास यांनी दिल्ली पोलिसांना तक्रार अशावेळी दिली आहे, जेव्हा फेसबुकबद्दल वाद निर्माण झाला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, फेसबुक हेट-स्पीच रूल्स कोलोइड विद इंडियन पॉलिटिक्सच्या शीर्षकासह प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर भारतात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील भाजप नेत्यांच्या द्वेषयुक्त भाषणाच्या बाबतीत फेसबुक नियमांना शिथिल करते. तसेच म्हटले आहे की, तेलंगणा येथील भाजप नेते टी राजा सिंह यांच्या एका पोस्टवरून फेसबुकमधील कर्मचार्‍यांनी सोशल मीडिया कंपनीच्या एका उच्च पदाधिकाऱ्याला भारतातील भाजपच्या द्वेषयुक्त भाषणाबद्दल सांगितले, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. टी राजा सिंह यांनी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराला पाठिंबा दर्शवण्याचा दावा आहे.

या अहवालाच्या आधारेच कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी फेसबुकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट केले की, ‘मार्क झुकरबर्ग कृपया यावर बोला. पंतप्रधान मोदींचे समर्थक अंखी दास यांची फेसबुकवर नियुक्ती केली गेली, ज्यांनी सोशल मीडियावर मुस्लिम विरोधी पोस्टला आनंदाने मंजुरी दिली. तुम्ही सिद्ध केले आहे की, तुम्ही जे उपदेश करता त्याचे पालन तुम्ही करत नाही.’

त्याचवेळी राहुल गांधींनी भाजप-आरएसएसवर निशाणा साधत म्हटले की, फेसबुक आणि व्हॉट्सऍप त्यांच्या ताब्यात आहे, ज्याद्वारे ते द्वेष आणि फेक न्यूज पसरवत आहेत.