राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भुमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात : काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भुमिकेमुळे अहमदनगर येथील काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असुन याबाबत आपण काही कारवाई करणार आहेत की नाही अशी विचारणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्हा समन्वयक तथा निरीक्षक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते अंकुश काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील हे नाराज आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यभरात आहे. त्यामुळे काही प्रमाणात वातावरण बिघडले आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणुन आमदार संग्राम जगताप हे निवडणुक लढवित आहेत तर भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील हे आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे माध्यमांंसमोर उघड उघडपणे अहमदनगरमध्ये युतीचा उमेदवार निवडुन येईल असे सांगतात, तसेच ते भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखेंचा प्रचार करतात, हे अतिशय गंभीर आहे. विखेंच्या या भुमिकेमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळेच राधाकृष्ण विखेंवर कारवाई करावी अशी मागणी अंकुश काकडे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे यांच्यामधील लढत ही चुरशीची होणार असल्याचे सध्या चित्र पहावयास मिळत आहे. डॉ. सुजय विखे हे वेगवेगळया कारणांमुळे सोशल मीडियामध्ये ट्रोल होत आहेत. प्रसंग न पाहता डॉ. सुजय विखेंनी फोटो सेशन केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.