बंदुकीने नव्हे, संवादाने प्रश्न सुटतील : अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बंदुकीने गोळ्या घालून किंवा बॉम्बस्फोट घडवून प्रश्न सुटणार नाहीत. संवादाने प्रश्न सोडतात. त्यामुळे नक्षलवादाने सरकारसोबत संवाद साधला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गडचिरोली येथील हल्ल्यांबाबत बोलताना दिली.

ते म्हणाले, संवाद ही आपली परंपरा आहे. संवादाने मोठमोठया तलवारी म्यान झाल्या आहेत. हा आमच्या देशाचा इतिहास आहे. बंदुक किंवा हत्याराने प्रश्न सुटणार नाहीत. तर ते अधिक जटील होतील. समाजात अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी बॉम्बस्फोट घडविले जातात. कधी दंगली घडविल्या जातात. प्रश्न सोडविण्याचा हा मार्ग नाही. समस्या दूर करण्यासाठी संवाद झाला पाहिजे. त्यातून निश्चित प्रश्न सुटू शकतील.

घटनेची सखोल चौकशी करा
महाराष्ट्र दिनी झालेल्या स्फोटाची चौकशी झाली पाहिजे. यापुढील काळात अशा घटनांना प्रतिबंध केला गेला पाहिजे. शत्रूपक्ष अथवा नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर त्याचे राजकारण केले जात असल्याबद्दलही हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ता व पैसा काही लोकांच्या डोक्यात घुसल्यामुळे त्याचा दुरुपयोग कोठे होईल हे सांगता येत नाही, असा टोला लगावत राजकारण करण्याची जागा वेगळी आहे, असे ते म्हणाले.