राजकारण्यांच्या भरवशावर नव्हे, तर जनरेट्यामुळेच ‘साकळाई’ मार्गी लागू शकते : आण्णा हजारेंचे परखड मत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनावर भरवसा ठेवत बसलाे तर गेल्या २० वर्षांपासून रखडलेला ‘साकळाई’ योजनेचा प्रश्न पुढील कित्येक वर्ष ही सुटणार नाही. सरकारला वाकवायची ताकद जनतेच्या एकजुटीत आहे. त्यामुळे जनता एकजूट झाली आणि आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरली तरच ‘साकळाई’ योजनेचा प्रश्न सुटेल. त्यादृष्टीने नियोजन करा असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांना दिला.

‘साकळाई’ उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळावी यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद – भोसले या नगरमध्ये क्रांतीदिनी (दि.९ ऑगस्ट) आमरण उपोषणास बसणार आहेत. या उपोषणाच्या जनजागृतीसाठी नगर तालुक्यातील गावांमध्ये त्यांनी जनजागृती सभा घेतल्या आहेत. येत्या शनिवारपासून (दि.२७) त्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती सभा घेणार आहेत. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व साकळाई योजना कृती समितीच्या सदस्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली. उपोषणाबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावेळी श्री. हजारे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली.

कोणताही प्रश्न कितीही अवघड असला तरी प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते, अडचणीवर उपाय असतात, फक्त त्यासाठी सकारात्मक मानसिकता असावी लागते. ‘साकळाई’ योजनेबाबत तीच मानसिकता राज्य सरकार आणि प्रशासनातील अधिकारी वर्गात नाही. त्यामुळेच हा प्रश्न रखडलेला आहे. एक काम मार्गी लावण्यासाठी हे सरकार नागरिकांना किती झुलवत आहे. राजकारणी पुढाऱ्यांनीही ‘साकळाई’ बाबत नुसती आश्वासने देवून आतापर्यंत किती निवडणुका लढवल्या आहेत. तरीही प्रश्न आहे तेथेच आहे. हीच खरी लोकशाहीची शोकांतिका आहे. अशी खंत हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.

हा प्रश्न सुटणार नाही असे नाही, जनतेच्या एकीच्या जोरावर तो निश्चित मार्गी लागेल. त्यासाठी जो पर्यंत प्रश्न सुटत नाही तो पर्यंत लढत रहा, असा कानमंत्रच यावेळी आण्णा हजारे यांनी दिला असल्याचे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सांगितले. अण्णांच्या भेटीमुळे आणि झालेल्या चर्चेमुळे एक वेगळीच उर्जा मिळाली असून हा लढा अधिक जोमात सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीच्या वेळी साकळाई योजना कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, बाळासाहेब नलगे, प्रविण शिंदे, उद्योजक विमल पटेल, प्रतिभाताई धस, भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त