महिला अत्याचारावर ‘चिंताग्रस्त’ असलेल्या अण्णा हजारांचे ‘मौनव्रत’

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपासून देशात महिला अत्याचारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हैद्राबाद येथे झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष निर्भया केसमधील आरोपींच्या दिशेने वळाले होते. अशा प्रकारच्या बलात्काराच्या घटनांमुळे चिंतातुर झालेल्या आण्णा हजारे यांनी आजपासून राळेगणसिद्धी येथे मौन व्रत धारण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णांनी गेल्या 9 डिसेंबरला पंतप्रधान मोदी आणि 10 डिसेंबरला राष्ट्रपती कोविंद यांना पत्र पाठवून निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली होती. अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे अण्णांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण राळेगणसिद्धी या आपल्या गावी मौनव्रत धारण करणार असल्याचे जाहीर केले होते.

काय म्हटलंय नेमकं आण्णा हजारेंनी प्रसिद्धी पत्रकात
दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.
देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत
न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे.
न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे.
यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.

फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा – सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगयाविना पडून आहे, हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे अशा अनेक गोष्टींबाबत अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये न्याय देण्यासाठी उशीर होत असल्यामुळे अपराध्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे आण्णा हजारे यांनी म्हंटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/