शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उद्या राळेगणसिद्धीत लाक्षणिक उपोषण

राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी मागील १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या राळेगणसिद्धीत महात्मा गांधी पुतळ्यासोमर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

उद्या (दि.८ डिसेंबर) सकाळी ९.३०. च्या सुमारास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणस्थळी पोहाेचतील. त्यानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करतील.

विरोधी पक्षांचा ‘भारत बंद’ ला पाठिंबा
केंद्र सरकार नवे कृषी कायदे करण्याची मागणी मान्य करत नसल्याने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी उद्या (दि.८ डिसेंबर) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, राजद, तेलंगण राष्ट्र समिती, द्रमक, डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे.