‘भाजप’ला अण्णा हजारे यांनी सुनावले खडे बोल

नगर : पोलीसनामा ऑनलाइन  –   दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या पत्राला लेखी उत्तर दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता एक व्हिडिओ द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गुप्ता आणि भाजपला खडसावत आपला राजकीय पक्षांशी संबंध जोडणाऱ्यांवरही अण्णा चिडलेले आहेत.

मागील आठवड्यात दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठविलेले होते. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपने नियोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. त्याला उत्तर देत हजारे यांनी लेखी पत्र पाठवून हे निमंत्रण नाकारले. इतकेच नाही तर, भाजपला खडे बोलदेखील सुनावले होते. त्यानंतर आज हजारे यांच्याकडून एक व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड करण्यात आला, त्यात पुन्हा गुप्ता यांना उत्तर दिले आहे. या व्हिडीवर समाज माध्यमांवर विविध मते व्यक्त होत असताना अण्णांनी त्यांचाही समाचार घेतला.

व्हिडीओमध्ये अण्णांनी सांगितले की, ‘जेव्हा मी २५ वर्षांचा युवक होतो तेव्हा माझ्या जीवनात एक ध्येय निश्चित केले होते की गाव, समाज आणि देशासाठी काम करणार. एवढी वर्षे मी लढत राहिलो. ४५ वर्षांत जे विधेयक होऊ शकले नाही, ते जनशक्तीच्या दबावामुळे शक्य झाले. त्यामुळे सरकारला ते मंजूर करावे लागले होते. आजही व्यवस्था परिवर्तन शक्य आहे, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला आहे.’’

अण्णांनी भाजपसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये ते म्हणाले की, गुप्ता यांनी आपली परवानगी न घेता आपले नाव असलेले हे पत्र प्रसारमाध्यमांना का दिले? एका बाजूला केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधात काम केल्याचे सांगत असताना भाजप मात्र भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी माझ्यासारख्या ८३ वर्षाच्या फकिराला का बोलवत आहे? हा विरोधाभास नाही का?