राळेगणसिध्दीने स्वीकारली राष्ट्रवादीच्या आमदाराची ‘ती’ योजना

नगर : पोलीसनामा ऑनलाईन –  पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि आमदार निधीतून 25 लाख रुपये मिळवा, अशी योजना तालुक्यात जाहीर केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आदर्शगाव राळेगणसिद्धीने ( Ralegan Siddhi Gram Panchayat) यंदा ही योजना स्वीकारली असून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना स्वीकारणारे राळेगणसिध्दी हे तालुक्यातील पहिलेच गाव ठरले आहे. दरम्यान लंके यांनी जाहीर केलेल्या या योजनेचे अण्णा हजारे आणि आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनीही कौतुक केले आहे. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र हे एकप्रकारे प्रलोभन असल्याची टीका केली आहे.

राळेगणसिध्दी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रत्येकवेळी बिनविरोध होत असते. गेल्यावेळी मात्र अपवाद ठरला ग्रामस्थांवर निवडणूक घेण्याची वेळ आली होती. यंदाही येथील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आ. लंके यांच्या पुढाकारातून सहमती दर्शविण्यात आली आहे.आमदार लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणा-या गावांना 25 लाख रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी त्यांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.

आमदार लंके यांनी सुपे येथे काही गावांच्या कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती. त्यात राळेगणसिध्दीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. राळेगणसिध्दी येथे औटी आणि मापारी असे दोन प्रमुख गट आहेत. या दोन्ही गटाचे नेते बैठकीला उपस्थित होते. समान जागा वाटप करून घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यावर दोन्ही गटांनी सहमती दर्शविली आहे. पारनेर तालुक्यात अशी सहमती करणारे आणि लंके यांच्या योजनेला प्रतिसाद देणारे राळेगणसिद्धी पहिलेच गाव ठरले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर आहे. त्यावेळीच खऱ्या अर्थाने ही सहमती टिकते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.