अण्णा फक्त एकदा डोळे उघडा, माझ्याकडे पहा… स्व.आ.सुभाष अण्णांचे शेवटचे ‘ते’ दोन दिवस

दौंड : अब्बास शेख पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवार ४ जुलै २००१ च्या पहाटेची वेळ. रंजनाताई कुल सुभाष अण्णांच्या खोलीमधून भेदरलेल्या अवस्थेत बाहेर पळत आल्या आणि थेट राहुल कुल यांच्या खोलीमध्ये जात राहुल उठ, राहुल उठ असे जोरजोरात आवाज देऊ लागल्या. झोपेमध्ये भविष्याची गोड स्वप्ने पाहत गाढ झोपेत असणाऱ्या तेवीस वर्षीय राहुल कुल यांनी काय ग आई, झोपू दे न.. असे म्हणत अंगावर पांघरून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांच्या कानावर अरे राहुल.. अण्णा..! असे आईचे शब्द पडले आणि राहुल कुल बिछान्यातून ताडकन उठून उभे राहिले.

अण्णांसोबत  काहीतरी भयंकर घडले असल्याची जाणीव त्यांना झाली. आणि त्यांनी थेट सुभाष अण्णांच्या खोलीकडे धाव घेतली. अण्णा बिछान्यावर एकदम शांतपणे पहुडले होते. ते दृश्य पाहून राहुल कुल यांच्या काळजात एकदम चर्र झाले आणि त्यांनी पूर्ण ताकदीने प्राण कंठात आणून अण्णा, अण्णा अश्या आर्त हाका मारत त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र अण्णांकडून कुठलाही प्रतिसाद जाणवत नसल्याने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. तो पर्यंत अण्णांना दवाखाण्यात नेण्यासाठी गाडी दारासमोर येऊन उभी राहिली. माय लेकरांना काहीच समजेना, घरामध्ये मोठा आरोड सुरू झाला.

आणि अण्णा उठा, अण्णा, अण्णा.. अश्या आवाजांनी कुलांचा वाडा शोकसागरात बुडून गेला होता. अण्णा मात्र काहीच बोलत नव्हते की हालचाल करत नव्हते अवघ्या २३ वर्षांचा एकुलता एक मुलगा मात्र अण्णांना काही होणार नाही, अण्णा आत्ता उठतील अश्या विश्वासाने अण्णा, अण्णा एकदा डोळे उघडा, मला पहा.. अश्या आर्त हाका मारतच होता. डॉक्टरांनी अण्णांना तपासून ते आपल्याला सोडून गेले असल्याचे सांगितले आणि राहुल कुल यांची हृदय हेलावून टाकणारी अण्णा… अशी किंकाळी ऐकू आली.

आपल्या भविष्याची स्वप्ने रंगावणाऱ्या त्या तेवीस वर्षे वयाच्या मुलाच्या डोक्यावरील छत्र काही तासांमध्येच हरपले होते. दोन दिवसांपूर्वी किरकोळ आजारी वाटत असलेले अण्णा इतक्या लवकर सर्वांना सोडून जातील हे कुणालाच खरे वाटत नव्हते. आज १८ सप्टेंबर २०१९ रोजी अण्णांची ६७ वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानेच थोडे मागे जाऊन दौंड तालुक्याच्या  इतिहासातील काही पाने चाळली जात आहेत.

दौंडचे दिवंगत आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या निधनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजे २ जुलैला अण्णा किरकोळ आजरी पडले होते. त्यांनी दवाखान्यात जाऊन चेकअप करावे म्हणून त्यांचे पुत्र व आत्ताचे विद्यमान आमदार  राहुल कुल हे अण्णांचे पाय दाबताना त्यांना विनंती करत होते. अण्णा मात्र स्मित हास्य करून काही नाही रे नॉर्मल आहे असे म्हणून विषय टाळत होते.

अण्णा आपले ऐकनार नाहीत म्हणून राहुल कुल यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जुलै रोजी राहू गावातील जेष्ठ मंडळी विठ्ठलराव सोनवणे, शंकरअप्पा कुल, ढमढेरे, आबासाहेब सोनवणे यांना बोलावून आणले आणि अण्णा  आता तरी दवाखाण्यात जाऊन चेकअप करतील असे त्यांना वाटले मात्र अण्णांनी आलेल्या जेष्ठांनाच काय म्हणतेय सर्वांची तब्येत, तुम्ही सर्वजण कसे आहात अशी विचारपूस करून मी ठणठणीत आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला. ३ जुलैच्या सायंकाळी अण्णांना राजेंद्र जगताप आणि रंगनाथ फुलारी येऊन भेटून गेले.

रात्री ११ वाजता राहुलदादा जेवण करून झोपी गेले अण्णा मात्र आपल्या सवईनुसार गावातील चौकात जाऊन क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसोबत १२ वाजेपर्यंत गप्पा मारत बसले आणि त्यानंतर ते घरी आले. रात्री २ वाजता त्यांनी दूध मागवले मात्र ते न पिताच ते झोपी गेले. अण्णा झोपी गेले ते पुन्हा उठलेच नाहीत. पहिल्यांदाच अण्णांच्या एका कृतीचा त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण तालुक्याला राग आला होता आणि ती कृती होती सर्वांना पोरके करून जाण्याची.

अण्णांच्या या वागण्याचा त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यालाच त्रास होत होता. कारण अण्णा नुसते कुल कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण दौंड तालुक्याचे आधारस्तंभ होते आणि हा आधारस्तंभच निखळला होता आणि संपूर्ण जबाबदारी सोडून गेला होता कमी वय असलेल्या आणि कुठलाही राजकीय रस नसलेल्या त्या एका जीवावर. तो जीव होता विद्यमान आमदार राहुल कुल. वयाच्या अवघ्या तेविसव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यावर काय होते हे तोच जाणू शकतो ज्याच्यावर असा प्रसंग ओढवला असेल.

निस्वार्थी राजकीय नेत्याची आणि सेवेच्या संस्कृतीची वानवा असणार्या सध्याच्या काळात साधेपणा आणि शिस्तीचा एकाच वेळी अवलंब करणारे स्व.आमदार सुभाष अण्णा कुल यांच्यासारखा नेता विरळाच. आदर्श राजकारणी कसा असावा याचे परिमाण प्रस्थापित करणाऱ्या सुभाष अण्णा कुल यांचा वारसा आज समर्थपणे विद्यमान आमदार राहुल कुल चालवत आहेत  पण अण्णांची न भरून निघणारी पोकळी आजही त्यांना जाणवते आणि अण्णांची आठवण झाली की नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात कारण शेवटी आई, वडील ही खूप मोठी संपत्ती आहे आणि त्यातील एक जरी छत्र हरपले तर मुलाची अवस्था काय होते हे ज्यांचे आई,वडील नाहीत त्यांना चांगलेच माहीत आहे.

येथे मात्र मुलावरील वडिलांचे नुसते छत्रच हरपले नव्हते तर अवघ्या २३ व्या वयात खूप मोठी जबाबदारी येऊन पडली होती. जबाबदारी होती आई, ३ बहिणी आणि सम्पूर्ण कुटुंबाची, जबाबदारी होती संपूर्ण तालुक्याची आणि तालुक्यातील जनतेची. तेविसव्या युवा अवस्थेत मुले मैदानावर खेळत असतात पण येथे मात्र जबाबदारी आली होती राजकीय मैदान गाजविण्याची, लोकांच्या गरजा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची ही जबाबदारी आली होती अण्णांच्या अचानक जाण्याने आणि अण्णा अचानक का गेले हेही जाणवले होते जनतेला प्रकर्षाने.

त्यामुळेच की काय तालुक्यातील जनतेने दिलेली जबाबदारीची धुरा आजही कुल कुटुंबीय समर्थपणे पार पाडत आहेत कारण शेवटी वारसा आहे दौंडचे दिवंगत आमदार सुभाषअण्णा बाबुराव कुल यांचा आणि तो पुढे चालवावाच लागणार आहे. कारण अण्णांनी दौंड तालुक्यासाठी हे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आता राहूल कुल यांनी पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे आणि त्यातूनच स्वाभिमानी दौंडची वाटचाल ही सुरू झाली आहे.

मात्र या वाटचालीचे खरे श्रेय हे सुभाष अण्णांच्या त्या दुरदृष्टीला आहे. कारण त्यांच्या दूरदृष्टी  स्वप्नांतूनच आज दौंडचा कायापालट होत आहे. अश्या दूरदृष्टी, मनमिळावू स्वभाव साधे राहणीमान आणि उच्च विचार असणाऱ्या सुभाष अण्णांना त्यांच्या ६७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

 

You might also like