”अण्णा” आता तुम्हीच बापटांकडे बघा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला  परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर  केला असे ताशेरे  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ओढले आहेत. या प्रकरणावरून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट राळेगणसिद्धी गाठत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. शिवाय या प्रकरणात अण्णा हजारे यांनी लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

प्रदेश काँग्रेस सचिव संजय बालगुडे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की,  बापट यांच्या गैरव्यवहार प्रकरणात हजारे यांनी चौकशीची मागणी करून सत्य सर्वांसमोर आणावे अशी विनवणी करण्यात आली आहे. शिवाय या संदर्भात हजारे यांनी सकात्मक प्रतिसाद दिला असून ते संबंधित विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहेत असेही त्यांनी बालगुडे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
बीडच्या मुरंबी गावात राहणाऱ्या साहेबराव वाघमारे यांनी बिभीषण माने यांच्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. माने यांचं स्वस्त धान्य दुकान आहे. मात्र ते शिधापत्रिकाधारकांना स्वस्त माल न देता तो काळ्या बाजारात विकतात, असा आरोप त्यांनी केला होता. अंबाजोगाईच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी केली. यात दुकानदार माने दोषी आढळल्यानं त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतही माने दोषी आढळल्यानं हे प्रकरण शेवटी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पोहोचलं. बापट यांनी दुकानदार माने याला आणखी एक संधी देत परवाना बहाल केला. हे संपूर्ण प्रकरण 2016 मध्ये घडलं.

यावर काय म्हणाले न्यायालय?
अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ओढले आहेत. दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला परवाना बहाल केल्याप्रकरणी न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्री जनतेचे विश्वस्त असतात. मात्र बापट यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश दिले, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं बापट यांची खरडपट्टी काढली.