अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्षपदी डॉ.जनार्दन वाघमारे तर स्वागताध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव कळंब यांच्या विद्यमाने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व पाक्षिक मूकनायक या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पाक्षिकाचा शंभर वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दिनांक १२ व १३ एप्रिल २०२० रोजी कळंब येथे दोन दिवसीय पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.जनार्दन वाघमारे लातूर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.जनार्दन वाघमारे हे ज्येष्ठ विचारवंत असून अस्मितादर्शक सह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. शिक्षणक्षेत्रात राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्यपदी आरूढ असताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लातूर पॅटर्न तयार केला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे ते पहिले कुलगुरूपदी विराजमान होऊन विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला. त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील कर्तव्य बजावले आहे. तसेच लातूर महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांची बहुविध वैचारिक ग्रंथसंपदा प्रकाशित असून ते निग्रो वाडःमयाचे गाढे अभ्यासक आहेत.

तर या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. डॉ.प्रतापसिंह पाटील यांनीही ही शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे कार्य केले असून महाराष्ट्रासह छत्तीसगड या राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. त्यासोबतच त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यामध्ये हातभार लावला असून प्रत्येक सामाजिक कार्यात ते हिरारीने सहभाग घेताना दिसून येत आहेत.

सद्य परिस्थितीमध्ये देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उग्र राष्ट्रवाद व मूलतत्त्ववादांच्या धार्मिक उच्छादाने सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. म्हणून डॉ.जनार्दन वाघमारे यांच्यासारख्या सापेक्ष विचारवंतांकडून लोकांच्या मनातील भयकंप घालून समताभिमुख समाज दृढमूल करण्यासाठी गरज आहे. या संमेलनात दोन्ही गरज पूर्ण करून समाजात दिशादिग्दर्शन निश्चितपणे होणार आहे. या निवडीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, रमेश बोर्डेकर, दत्ता गायकवाड, किशोर वाघमारे, सचिन क्षीरसागर, विशाल वाघमारे, उत्तम कांबळे, शीलवंत गुरुजी, सी.आर. घाडगे,डी.टी.वाघमारे, विठ्ठल समुद्रे, भारत जाधव, यु.एल.घोडके,अनिल हजारे,भास्कर सोनवणे,अरुण गरड हे उपस्थित होते. या निवडी झाल्याचे या संमेलनाचे मुख्य संयोजक प्रा.डॉ. संजय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.