सूरबहार शास्‍त्रीय संगीतकार अन्नपूर्णा देवी काळाच्या पडद्याआड 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन 
शास्‍त्रीय संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचे आज ( १३ सप्टेंबर ) सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्‍या ९१ व्‍या वर्षी निधन झाले आहे. श्वासोच्छवास घेण्‍यास त्रास होत असल्याने त्यांचे निधन झाले.
शास्‍त्रीय संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचा २३ एप्रिल १९२७ ला मध्य प्रदेशातील मैहरमध्‍ये जन्म झाला होता, त्यांनी त्‍यांचे वडिल उस्ताद ‘बाबा’ अल्लाउद्दीन खान यांच्‍याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते.   संगीत नाटक अकादमी पुरस्कार – हिन्दुस्तानी संगीत – इन्स्ट्रुमेंटल (सुरबहार) अश्या अनेक पुरस्कारांनी अन्नपूर्णा देवी सन्मानित झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले  होते. पंडीत हरिप्रसाद चौरसिया(बासरी), निखील बॅनर्जी, आशीश खान(सरोद), अमित भट्टाचार्य(सरोद) व वसंत काब्रा (सरोद) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. अन्नपूर्णा देवी यांच्या निधनामुळे  गेल्या अनेक दशकांपासून एका साधनेने  सुरू असलेल्या सुरेल मैफलीतील ‘बहार’ गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रसिध्‍द संगीतकार पंडित रवि शंकर यांच्‍याशी त्यांनी  विवाह केला होता. त्‍यांच्‍या मुलाचे नाव शुभेंद्र शंकर असे आहे.