अण्णासाहेब पाटील महामंडळाची सूत्रे अजित पवारांकडे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दोन-तीन दिवसांपूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आता या महामंडळाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गुरुवारी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार नियोजन मंडळाकडे देण्यात आला आहे तसा आदेश जारी करण्यात आला असून अजित पवार यांच्या अखत्यारीत नियोजन विभाग येतो. यापूर्वी सारथी या संस्थेचाही कारभारही नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे.

सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याच्या मागणीवरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला. सारथीचा कारभार आधी बहुजन कल्याण विभागाकडे होता. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे या विभागाचे मंत्री आहेत. तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. आतापर्यंत या महामंडळाचा कारभार कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या अखत्यारित होता. हा विभाग राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याकडे आहे.

दरम्यान, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी केल्याने आपल्याला महामंडळावरून हटविण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता.