इंदुरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य, लेखी युक्तीवादाला न्यायालयाची परवानगी !

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन –   निवृत्ती काशीनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. अंनिसच्या (अंधश्रद्धा निर्मुलन समिती) वतीनं या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयानं नायाधीश डी एस घमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तीवादाला परवानगी दिली आहे.

संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ भास्कर भवर यांनी इंदुरीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात 19 जून रोजी संगमनेर कोर्टात फिर्याद दिली होती.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी डी कोळेकर यांच्या समोर 3 जुलै रोजी कामकाज झालं होतं. त्यानंतर इंदुरीकरांचे वकिल के डी धुमाळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या या प्रकरणातील स्थगितीच्या आदेशाची माहिती संगमनेर कोर्टात दिली. यानंतर पुढील सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आली.

या प्रकरणात अंनिसच्या वतीनं अ‍ॅड रंजना गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. यावर शुक्रवारी सुनावणी झाली.

कोर्टानं अंनिसचा अर्ज मान्य केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणात अ‍ॅड गवांदे यांना लेखी युक्तीवाद करता येणार आहे. आता पुढील सुनावणी ही 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे.