महाराष्ट्रातील राजकारण बदलणार्‍या सातार्‍यातील ‘त्या’ ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती ! झाली होती अनेक ‘पैलवानां’ची बत्ती गूल

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आज 18 ऑक्टोंबर म्हणजे राज्याच्या राजकाराणाला कलाटणी देणा-या दिवसाची वर्षपूर्ती होय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील जाहीर सभा सर्वांना भावली अऩ विधानसभा निवडणुकीचे चित्रच पालटून गेले.या सभेने सातारकरच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील सर्वच समीकरणे बदलून गेली. सत्तेची आशा नसलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेशी आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केले.अन भाजपच्या गर्वाचे घर खाली केले म्हणून या दिवसाला राज्याच्या राजकाराणात अन्यनसाधारण महत्व आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सातारा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपने केला. उद्यनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोघांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे हा अभेद किल्ला हातचा जाऊ द्यायचा नाही, म्हणून शरद पवार यांनी स्वतः मैदानात उडी घेतली. वर्षभरापूर्वी सातारा जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेने सर्वच राजकीय समीकरणे बदलली.

या सभेपूर्वी पंतप्रधान मोदी यांची साता-यात मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटण येथील सभा उरकून शरद पवारांनी साता-यात पाय ठेवताच पावसाला सुरुवात झाली. पण लोक जागचे हालले नाही. पवार बोलायला उभे राहिले अन पावसाचा जोर वाढतच राहिला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली. अन धो-धो पावसासोबतच धीरगंभीर आवाजात पवार बरसू लागले. गतवेळी माझी चूक झाली. ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरानी करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले. पवारांच्या या सभेचा व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला. राष्ट्रवादीने या सभेच्या वर्षपूर्तीसाठी एका छोटखानी सभेचे आयोजन केले आहे.