शाळा सुरू होण्यापूर्वी निकाल जाहीर करा, शिक्षण विभागाचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यभरात हाहाकार उडाला असल्यामुळे अनेक शाळांच्या निकालाचे कामकाज कासवगतीने सुरु आहे. मात्रा, शाळा सुरू होण्यापूर्वी आधीच्या वर्षांचे निकाल जाहीर करावेत असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. विद्यार्थ्यांंना मेल, एसएमएस, व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रगतीपुस्तक देण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील बहुतांश शाळांच्या वार्षिक निकालाचा दिवस 1 मे असतो. यंदा मात्र कोरोनाच्या सावटात निकालाचा दिवस अजून उगवलाच नाही. राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांंची वर्षभरातील कामगिरीनुसार अंतिम मूल्यांकन करण्याच्या सूचना विभागाने यापूर्वीच दिल्या आहेत. आता शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांंना गुणपत्रक देण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन गुणपत्रक कसे द्यावे याचा निर्णय शाळांनी घ्यायचा आहे.

निकाल ऑनलाईन जाहीर करण्याचा पर्याय विभागाने दिला आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या कामगिरीचे तपशील शाळांमध्ये आहेत. टाळेबंदीमुळे शिक्षकांना शाळांपर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही. अनेक शिक्षक गावी गेले आहेत. त्यामुळे निकाल तयार कसे करायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दिलेले आदेश कसा पाळायचा असा सवाल शाळांनी विचारला आहे.