उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी आपल्‍या दैनदिन खर्चाचे मूळ अभिलेखे तपासणीसाठी निवडणूक कार्यालयामार्फत पुरविलेली उमेदवार खर्च नोंदवही (भाग अ,ब,क) खर्चाचे प्रमाणके (Vouchers) व बील, धनादेश पुस्‍तक व बँक पासबुक इत्‍यादी कागदपत्रासह निवडणूक खर्च निरीक्षक यांना उपलब्‍ध करुन देणे बंधनकारक आहे.

आपल्‍या दैनदिन खर्चाचे मूळ अभिलेखे तपासणीसाठी आपण स्‍वतः अथवा आपल्‍या अधिकृत प्रतिनिधी यांना पाठविण्‍यात यावे. खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहिर झालेले असून पहिली तपासणी शनिवार दिनांक १३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत, दुसरी तपासणी बुधवार दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत व तिसरी तपासणी रविवार दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत जिल्‍हाधिकारी सभा कक्ष (मिटींग हॉल) नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे होणार आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक अजित कुमार मिश्रा असून त्‍यांचा भ्रमणध्‍वनी / मोबाईल क्रमांक ९४०३८६३४९ असा आहे. प्रत्‍येक तपासणीसाठी दिनांकांच्‍या दोन दिवस पूर्वीपर्यतचे ( उदा.दिनांक १३ एप्रिल २०१९ रोजीच्‍या तपासणीसाठी ११ एप्रिल २०१९ अखेरपर्यतचे लेखे ) सादर करणे बंधनकारक आहे, असे अहमदनगर लोकसभा मतदार संघ, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.