… म्हणून शरद पवार खासदारकीची शपथ घेत असताना नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात घोषणाबाजी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर बुधवारी संसदेचं कामकाज सुरु झालं. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शपथ घेतली. शरद पवार दिल्लीत शपथ खासदारकीची शपथ घेत असताना मात्र नाशिक शहरामध्ये त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करत शरद पवार यांनी राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्याचा तिव्र निषेध करण्यात आला.

खासदार शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर असताना राम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का असं विधान केलं होतं. एवढंच नाही तर शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला होता. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम… चलो अयोध्या अशा आशयाचे पत्र पाठवलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनावरून मोदी सरकारवर खोचक टीका केली होती.

कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. मात्र, काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आम्हालाही वाटतं की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत, ते दिल्लीत जाऊन या मुद्यावर प्रश्न मांडतीलच, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं होतं.