संतापजनक ! नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, पोटात होते चार बछडे; महाराष्ट्रातील घटना

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – वाघाच्या नख्यांना मागणी असल्याने वाघांची शिकार होण्याच्या घटना वाढत आहेत. एका गरोदर वाघिणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी (दि.26) सकाळी ही घटना उघडकीस आली असून वाघिणीची शिकार केल्यानंतर तिच्या पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले आहेत. दरम्यान एक महिन्यापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. एकाच महिन्यात दोन वाघांची शिकार झाल्याने शिकार करणाऱ्यांच्या टोळ्या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र.30 मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी असलेल्या नाल्याला लागून एक गुहा आहे आणि या गुहेत वाघीण वास्तव्यास होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय लहान आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी हे पाहिले असणार आणि वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. या आगीमध्ये वाघिणीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी शिकाऱ्यांनी तिच्या शरिरावर धारदार हत्याराने वार केले. वाघिण मेल्याची खात्री पटल्यानंतर शिकाऱ्यांनी तिच्या पायाचे पंजे कापून नेले.

या घटनेची माहिती वनरक्षकाने आपल्या वरिष्ठांना दिली. ही माहिती समजताच विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक, मुकुट बन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराना यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार वर्षाय वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकलेला दिसून आला. परिसरात बांबूच्या काड्या, क्लच वायर, जाळल्याच्या खुणा आढळून आल्या. मृत वाघिण ही गर्भवती होती. तिच्या पोटात चार बछडे होते. वाघिणीची शिकार करणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.