नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या खासदारांच्या संपत्तीत वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये देशात खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या स्थानावर होत्या. ५१ कोटींच्या त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन सन २०१४ मध्ये ती ११३ कोटींवर पोहोचली. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपत्ती मध्ये देखील गेल्या पाच वर्षात तब्बल १४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल सोमवारी नितीन गडकरी यांनी नागपूर येथून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे.
सोमवारी गडकरींनी सादर केलेल्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये त्यांची उत्पन्न ६.४ लाख इतके होते. तर ५ वर्षापूर्वी २०१३-१४ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न २.७ लाख इतके होते. २०१४-१५ या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नात ६ लाखांनी वाढ झाली. त्यानंतर त्यांचे उत्पन्न मात्र स्थिर आहे.
एकूण संपत्ती ७ कोटी
गडकरींची एकूण संपत्ती ६.९ कोटी रुपये अतकी आहे. यातील १.९६ कोटी संपत्ती वडीलांकडून मिळालेली आहे. २०१४च्या तुलनेत या संपत्तीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वडीलांकडून मिळालेल्या संपत्तीचे मुल्य वाढल्याने ही वाढ झाली आहे. गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्याकडे ७.३ कोटी इतकी संपत्ती आहे. २०१४च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत १२७ टक्के वाढ झाली आहे. गडकरी यांच्याकडे वरळी येथे एक फ्लॅट आहे. या घराची किंमत २०१४मध्ये ३.७८ कोटी इतकी होती ती आता १२.५ टक्क्यांनी वाढून ४.२५ कोटी झाली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे २२ लाखांचे दागिने आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांना गेल्या पाच वर्षातील आय टी रिटर्न्समधील उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे.