संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीऐवजी आता पादुकांवर अभिषेक, बदलली अभिषेकाची ‘पद्धत’

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – अभिषेक आणि महापूजा दररोज होत असल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीची झीज होत आहे. त्यामुळे आता यापुढे संजीवन समाधी ऐवजी पादुकांवर अभिषेक आणि महापूजा करण्यात येणार आहे. हा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज शुक्रवारपासून सुुरु करण्यात आली आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
संत ज्ञानेश्वर संजीवन समाधीवर दररोज सकाळी ५ वाजल्यापासून अभिषेक, महापूजा सुरु होते. या मंदिराला गाभारा हा १९ व्या शतकातील आहे. गाभारा लहान असल्याने सकाळी अभिषेक सुरु झाल्यावर भाविकांना समाधीचे दर्शन घेण्यास अडचण होत. तसेच गाभात गर्दी होत होती. दिवसभरात ४० ते ५० अभिषेक, महापुजा केल्या जातात.

प्रत्येक अभिषेकाच्या वेळी दुध, दही, मध, पिढीसाखर हे संजीवन समाधीवर अर्पण करण्यात येत असल्याने त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन संजीवन समाधीची झीज होत आहे. ही झीज टाळणे त्याच बरोबर श्रींची समाधी, संवर्धन, जतन आणि पुजा, अभिषेक, महापूजा या प्रसंगीचे पावित्र्य याला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला. आता भाविकांना महापुजा संजीवन समाधी ऐवजी वारीमध्ये वापरण्यात येणाऱ्या चलपादुकांची महापूजा करता येणार आहे.

महापूजा, अभिषेक याची पद्धत बदलल्याने आता भाविकांना संजीवन समाधीचे दर्शन घेण्यास विलंब लागणार नाही. पूजा उपचारबाबत भाविकांच्या मागणीचा विचार करुन प्रायोगिक तत्वावर निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भाविकांसह सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/