Coronavirus : सोलापूरमध्ये आतापर्यंत 145 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर येथे कोरोना ने हाहाकार माजविला आहे काल मंगळवारी दिवसभरात 3 रुग्णाचा मृत्यु झाला तर पोलीस, लॅब असिस्टंटसह 10 जणांना संसर्ग झाला आहे. कोरोनाने आता शहराबाहेर ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला आहे, यामुळे ग्रामीण भागातील जनतेत घबराट पसरली आहे. सोलापूर शहरांमध्ये करोना रुग्णांची वाटचाल आता दीड शतकाकडे सुरू झाली आहे. मंगळवारी एक पोलीस आणि एका रुग्णालयातील लॅब असिस्टंटसह शहर आणि ग्रामीण भागातील एकूण दहा जणांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ज्यामध्ये 5 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या आता 145 इतकी झाली आहे. मंगळवारी एका 63 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 9 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मयतामध्ये 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. मंगळवारी जे 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यामध्ये शास्त्री नगर,पोलीस मुख्यालय ग्रामीण,सदर बझार लष्कर,राहुल गांधी झोपडपट्टी,विजापूर रोड हुडको कॉलनी,कामाठीपुरा,नीलम नगर एमआयडीसी, एकता नगर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील उळे गावातील रुग्णांचा समावेश आहे. एका रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाची टेस्टही मंगळवारी पॉझिटिव्ह आली आहे. हा तरुण दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील उळे गावचा रहिवासी आहे.

तसेच दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वडकबाळ येथील चेक पोस्टवर कार्यरत असणाऱ्या ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याची टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे वडकबाळ चेक पोस्ट परिसरात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. तर सोलापूर तालुक्‍यातील उळेगावचा तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. याठिकाणी निर्जंतुकीकरणासह इतर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. याशिवाय सोलापूर शहरातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील एकूण 39 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची टेस्ट घेतल्यावर 35 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हे सुद्धा 55 वर्षीय पोलीस कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली.