हप्ता न दिल्याने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनी सुरु ठेवण्यासाठी एक लाखांचा हप्ता दिला नाही, तसेच चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही, या रागातून खुनाचा प्रयत्न (attempt Murder) केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात येरवडा (Yerawada police) पोलिसांनी आणखी एकाला अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणात यापूर्वी नऊ जणांना अटक करण्यात आली असून पाचजण अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लखनसिंग महिंदर भोंड (वय- 25 रा. बिराजदार नगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 14 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. हा प्रकार 6 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास येरवडा येथे सुरक्षानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.

तक्रारदार यांनी आरोपींना कंपनी सुरु ठेवण्यासाठी एक लाख रुपयांचा हप्ता दिला नाही. तसेच चुलत भावाच्या लग्नाला बोलवले नाही. याचा राग मनात धरुन आरोपींनी तक्रारदार यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रारदार यांच्या वाहनाची तोडफोड करत नुकसान केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये आरोपी भोंड आढळून आला. त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यालायला केली. न्यायालयाने ती मान्य केली.