उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ जुन्या दिग्गज नेत्याचा राजीनामा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील वजनदार उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी भाजपच्या मेगाभर्तीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही.

एकेकाळी मुंबई काँग्रेसवर वर्चस्व राखणारे कृपाशंकर सिंह गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात हाेते. आज त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तत्पूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिला होता. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे उर्मिला यांनी म्हटले होते.

उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी योग्य काम केले नसल्याची तक्रार त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता त्यांना पदं देण्यात आली नाही.