मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला तेथे आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुंब्रा रेतीबंदर येथे आज सकाळी आणखी एक मृतदेह सापडला. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ज्या गाडीत जिलेटिन कांड्या सापडल्या. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुब्रा रेतीबंदर येथे सापडला होता. त्याच ठिकाणी आज सकाळी आणखी एक मृतदेह मिळाल्याचे एकच खळबळ उडाली.

शेख सलीम अब्दुल (वय ४८, रा. रेतीबंदर, मुंब्रा) असे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठविला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर येथे सापडला होता. त्यांचे हातपाय बांधले होते. तसेच त्यांच्या तोंडाला मास्क असताना आत काही रुमाल आढळून आले होते. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनीच त्यांचा खुन करविला असा आरोप केला आहे. त्यामुळे त्या परिसरात दुसरा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.