शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

शेवगाव : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगावात ढोरा नदी पात्रात बुधवारी (दि.27) एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या चेहऱ्यावर जखमा आहेत. त्यामुळे ही हत्याच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी (मायलेकाच्या) हत्याकांडाचा अद्याप तपास लागला नाही. त्यातच पुन्हा हा मृतदेह सापडल्याने शहर व परिसरातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शेवगाव- नेवासे रस्त्यावरील ढोरा नदी पात्रातील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे बुधवारी काही जणांनी पाहिले. त्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलिस कर्मचारी बप्पासाहेब धाकतोडे, वैजनाथ चव्हाण आदीनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला.

त्यावेळी त्याच्या अंगात पूर्ण बाह्याचा शर्ट व जीन्स पँन्ट आढळून आली. त्याच्या चेह-यावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. तसेच खिशामध्ये सापडलेल्या दोन आधार कार्डवर नाव जय राजेश वखरे (वय-21 ) असे नाव आणि पत्ता आहे. मात्र, त्यावर परभणी व बीड असे दोन वेगवेगळ्या ठिकाणांचा उल्लेख आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे अधिक तपास करीत आहेत.