13 दिवसात दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरी पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. त्यांचा दुसरा धाकटा भाऊ एहसान खान यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. एहसान खान यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अल्झाइमर देखील होता. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एहसान खान यांच्या निधनाबद्दल रात्री उशिरा लीलावती रुग्णालयाने माहिती दिली. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ‘अर्ध्या तासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोविड १९ चा संसर्ग झाला होता. त्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अल्झायमर आजार होता.’

एहसान खान यांच्या अगोदर २१ ऑगस्ट रोजी दिलीप कुमार यांचा आणखी एक छोटा भाऊ असलम खान यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. तेही कोरोना संक्रमित होते. त्यांनाही मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असलम खान यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इस्केमिक हृदयविकार होता. त्यांची कोविड १९ चाचणीही पॉझिटिव्ह आली होती.

दिलीपकुमार यांचे दोन भाऊ एहसान खान आणि असलम खान यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. असलम खान यांच्या निधनानंतर एहसान खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते की, एहसान खान यांची प्रकृती फारशी ठीक नाही आणि ते जास्त हालचालही करत नाहीत. त्यांच्या शरीरात आधीपासूनच ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्यावर श्वास घेण्यात अधिक त्रास होत आहे.