राज्यातील आणखी एक बँक संकटात, RBI नं पैसे काढण्यावर घातली बंदी

मुबंई: गेल्या काही दिवसापासून सहकारी बँका संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कारवाई केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच राज्यतील आणखी एक सहकारी बँक संकटात सापडली आहे. नाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेच्या चौकटीत बँकेतील ९९.८८ टक्के ठेवीदार आहेत.

यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने सांगितले की, इंडिपेंडेंस बँकेमधून पैसे काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बँकेच्या बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ठेवीदार हे ठेवींच्या बदल्यात कर्जाची फेड करू शकतात. त्यासाठीही काही अटी लागू आहेत असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बुधवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेवर अजून काही निर्बंध लादले. त्याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कर्ज देऊ शकणार नाहीत. तसेच कुठल्याही कर्जाचे नुतनीकरण करू शकणार नाहीत. याशिवाय कुठलीही गुंतवणूक किंवा कुठल्याही रकमेची फेड करणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार बँक निर्बंधांनंतरही आपला बँकिंग व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकेल. हे निर्बंध आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत सुरू राहतील. केंद्रीय बँकेने हेसुद्धा सांगितले की, रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये दुरुस्तीही करू शकते.

काय आहे डीआयसीजीसी ?
डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) हि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वामित्वाखालील सब्सिडियरी आहे. ती बँकेतील जमा रकमेवर इंश्योरन्स कव्हर उपलब्ध करून देते. पाच लाख रुपयांच्या डिपॉझिट विम्याची तरतूद आहे. त्यानुसार बँक दिवाळखोरीत निघाल्यास खातेदाराला पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.