आंबेगाव तालुक्यात दुसरा ‘कोरोना’ रुग्ण, मुंबईत चालवत होता कॅब

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनापासून दोन दिवसांपर्यंत दूर असलेल्या आंबेगाव तालुक्याला मुंबईच्या प्रवाशांनी कोरोना बाधितांच्या यादीत टाकले आहे. आंबेगाव तालुक्यात मुंबईहून आलेला दुसरा कोरोना बाधित असल्याचे आढळून आला आहे. ५० वय असलेला हा रुग्ण आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे आला होता़ तो मुंबईत कॅब चालवत होता.

शिनोली गावठाणात आई वडिल व भावासह रहात होता. तो १६ मे रोजी घाटकोपरहून शिनोलीत आला होता. १७ मेला त्याला त्रास होऊ लागला. त्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठविले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

याची माहिती मिळताच संपूर्ण शिनोली गाव सील करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यास सुरुवात झाली आहे. आंबेगाव मध्ये यापुर्वी साकोरे येथे एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे. आता हा दुसरा रुग्ण मिळाला आहे.

You might also like