सुधारगृहातून सुटताच खुनातील दोन आरोपींनी दुचाकी चालकाला लुटले..  

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – खुनाचा आरोप असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींची सुधारगृहातून सुटका होताच त्यांनी एका दुचाकीस्वाराला लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे. २० डिसेंबर २०१८ रोजी घडलेल्या लुटमारीत हे दोघे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे या दोघांना त्यांचे पालकच असे गुन्हे करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

सचिन देशमुख (३७) हे भावसिंगपुरापरिसरातून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीवरून जात होते. या वेळी या अल्पवयीन आरोपींनी त्यांना हात दाखवून थांबवले. लिफ्ट मागण्यासाठी त्यांनी थांबवले असेल, असा समज झाल्याने सचिन त्यांना मदत करण्यासाठी थांबले असता दोघांनी त्यांना मारहाण केली. एका आरोपीने त्यांच्या गळ्यातील २२ हजारांची सोनसाखळी, मोबाइल, रोख रक्कम आणि आधार कार्ड असलेले पाकीट हिसकावून त्यांचीच दुचाकी घेऊन तेथून पळ काढला. लूटमार केलेल्या दोघांविषयी गुन्हे शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार, बायजीपुरा परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

अशी आहे या आरोपींची ओळख…

या दोन्ही अल्पवयीन आरोपींवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. हे दोघे ९ वर्षांचे असल्यापासून पाकीटमार करतात. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी या दोघांनी नारेगाव परिसरातील मुसा कादर कुरेशी (४५) यांची हत्या केली होती. महिन्यानंतर कुरेशी यांचा मृतदेह नाल्यात आढळला होता. त्यात या दोघांचा हात असल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.