राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थवर मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा आणखी एक FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण लागत असून त्यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे व त्याच्या साथीदारांनी तानाजी पवार याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेला असतानाच निगडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर आणखी एक खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत काल गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी सिद्धार्थ बनसोडे, अण्णा बनसोडे यांचा पीए व इतरांनी आदल्या दिवशी ११ मे रोजी तानाजी पवार यांच्या कार्यालयात जबरदस्तीने शिरुन दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

या घटनेत आय टी एक्झिक्युटिव्ह विनोदकुमार अशोक रेड्डी (वय २९, रा. रुपीनगर, तळवडे), कामगार गोकर्ण सुदाम चव्हाण (वय ४५, रा. महादेवनगर, मांजरी) हे गंभीर जखमी झाले आहेत. सिद्धार्थ बनसोडे, बनसोडे यांचे पीए व इतर ८ जणांवर ३०७, ३२५, ४५२, २६९, ३२४, ३२३, १४१, १४३, १४५, १४७, १४९, ५०६ तसेच साथीचे रोग अधिनियम, महाकोविड २०१९ उपाय योजना आदि कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी स्वाती सचिन कदम (वय ३९, रा. रायगड कॉलनी, फुरसुंगी) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील हेगडेवार भवनशेजारील ए जी इन्व्हीरो इन्फा प्रा़ लि़ या कार्यालयात घडला होता. फिर्यादी यांना धमकी दिल्याने त्या घाबरलेल्या असल्याने त्यांनी तेव्हा तक्रार दिली नव्हती.

त्यांच्या फिर्यादीनुसार ११ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या कार्यालयासमोर अचानक एक ग्रे रंगाची स्विफ्ट कार थांबली. कार व एका दुचाकीवरुन येऊन सिद्धार्थ बनसोडे व बनसोडे यांचे पी ए व इतर ८ जण कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना हाताने मारहाण करुन पुन्हा ऑफिसचे समोरील बाजुला येऊन बेकायदेशीर जमाव जमवून कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कोठे आहेत, असे विचारले.

त्यांनी माहिती नाही असे सांगितल्यावर त्यांनी जबरदस्तीने आय टी एक्झिक्युटिव्ह विनोदकुमार रेड्डी यांना डोक्यावर लोखंडी टॉमी ने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हाण याला ढकलून देऊन जखमी केले. फिर्यादी यांना जबरदस्तीने ऑफीस बंद करण्यासाठी सांगून तानाजी पवार याला शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघुन गेले होते. या ११ मेच्या प्रकारानंतर सिद्धार्थ बनसोडे व इतरांनी काल १२ मे रोजी पुन्हा त्यांच्या कार्यालयात येऊन त्यांचे अपहरण करुन मारहाण केली होती. त्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.