सेवा विकास बँकेचे चेअरमन अमर मुलचंदानी यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा FIR दाखल

पिंपरी : सेवा विकास बँकेचे चेअरमन अमर मुलचंदानी यांच्यासह १५ जणांवर बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेची ५ कोटी ७५ लाख्र रुपयांची फसवणुक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजयकुमार गोपीचंद रामचंदानी (वय ५२, रा. पिंपरी ) या व्यापार्‍याने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन अमर मुलचंदानी (वय ६१ रा. पिंपरी), मॅनेजर रश्मी तेजवाणी (वय ५४), अकाऊटंट हरेश चुगवाणी (वय ५२), सहायक जनरल मॅनेजर विजय चांदवाणी (वय ५५), जॉइंट सी ई ओ रमेश हिंदुजा (वय ६२), अ‍ॅडिशनल सी ई ओ हिरामणी मुलाणी (वय ६२), सी ई ओ तुलजो नारायण लखाणी (वय ८०), मॅनेजर उर्वशी उदारामाणी ऊर्फ रिया महेश परवाणी (वय ३५, सर्व रा. पिंपरी), शहाबाज अब्दुल अजिज शेख (वय ४३, रा. शास्त्रीनगर , येरवडा), हया शहाबाज शेख (वय ४४, रा. येरवडा), शीतल तेजवाणी (वय ४०), गिरीश तेजवाणी (वय ३९, दोघे रा. पिंपरी), सागर सूर्यवंशी (वय ४३, रा. कल्याणीनगर), महादेव ऊर्फ बल्ला साबळे (वय ४०, रा. पिंपरी), गणेश वर्मा (वय ४८, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आरोपींनी पिंपरीतील सेवा विकास बँकेत अधिकारावर असताना २०१५ मध्ये आपसात संगनमत करुन बनावट कागदपत्रे तयार करुन नियमबाह्य कर्ज मंजूर केली. त्यानंतर ही कर्जे थकवून बँकेची ५ कोटी ७५ लाख ६३ हजार ५६७ रुपयांची फसवणूक केली आहे. सेवा विकास बँकेत नियमबाह्य पद्धतीने १९ कोटी रुपयांची कर्जे मंजूर करुन फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत. या गुन्ह्यात अमर मुलचंदानी याला ८ मार्च रोजी अटक केली आहे. १९ मार्च रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे़.