पुण्यात घरफोडीचे सत्र सुरूच, पावणे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील घरफोड्यांचा धडाका सुरूच असून, चतुश्रृंगी परिसरातील एका मोठ्या कंपनीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पावणे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीसांना काही केल्या या घटना रोखण्यात यश येत नसल्याचेही यावरून दिसत आहे.

याप्रकरणी विष्णू जिजाभवन (वय.38,रा. विवेकनगर आकुर्डी) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कंपनी असून, त्यांच्या कंपनीचे पाषाण रोडवर न्यु ऑरबिट एंटरप्राईजेस नावाने गोडाऊन आहे. दरम्यान मंगळवारी रात्री गोडाऊन बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनीशटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. तसेच, गोडावूनमधील रॅकमध्ये ठेवलेले ए.सी. कॉपरचे पाईप, तसेच केबल बंडल, ड्रिल मशीन व टुल्स तसेच रबर स्टॅम्प असा 5 लाख 80 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चव्हाण करत आहेत.