पिंपरी महापालिकेच्या आणखी एका अधिकार्‍याचे ‘कोरोना’मुळे निधन

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसून येत नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

वायसीएम रुग्णालयाच्या चाणक्य विभागात कार्यालयीन अधिक्षक असलेल्या साईनाथ लाखे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. लाखे यांच्या निधनाबद्दल वायसीएम रुग्णालयातील कर्मचारी व अधिकार्‍यांनी शोक व्यक्त केला आहे.