Nawab Malik : ‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘भाजपच्या माजी आमदाराकडे रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध झाला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा रेमडेसिव्हिरचा साठा त्यांच्या गोडाऊनमध्ये होता’, असे ते म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन परिणामकारक ठरत आहे. मात्र, याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी आणखी एक गंभीर आरोप करत भाजपच्या माजी आमदाराचे नाव घेतले आहे. त्यामध्ये मलिक यांनी म्हटले, की ‘भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिव्हिरचा साठा जमा करून ठेवला होता. त्यांनी स्वतः फोटो जाहीर केले आहेत. त्यामध्ये ग्रुप फार्माला ‘ओन्ली फॉर एक्स्पोर्ट’ हे औषधांवर लिहिलेले असताना 8 एप्रिल रोजी चौधरी बांधवाकडून रेमडेसिव्हिर रांगा लावून वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवस लॉकडाऊन असल्याने वाटप करण्यात येणार नाही, असे सांगून 12 एप्रिलला पुन्हा वाटप करण्यात आले’.

दरम्यान, सुमारे 700-800 इंजेक्शन वाटण्यात आले. मात्र, आमच्या माहितीनुसार 20 हजारांपेक्षा जास्त रेमडेसिव्हिर ब्रुक फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी 700-800 इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

काळाबाजार करणाऱ्यांना वाचवण्याचा भाजपचा धंदा

ही साठवण करणारी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काळाबाजार करत आहेत त्यांना वाचवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. हे राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिवीर लोकांना भेटेल, असेही ते म्हणाले.