बडव्यांची बंडखोरी.. बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपुरातील बडव्यांनी बंडखोरी करत पंढरपुरामध्ये विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. त्यामुळे आता पंढरपूरमध्ये एक मंदिर नाही तर दोन विठ्ठल असणार आहेत. बडव्यांनी १५ जानेवारी २०१४ पासूनची खंडीत झालेली उपसाना पुन्हा सुरु करण्यासाठी स्वतंत्र विठ्ठलाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यासाठी त्यांनी बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या मंदीरात दुसऱ्या विठ्ठलाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे बडव्यांची बंडखोरी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे समोर आले आहे.

विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर बडवे समाजाने वेगळे विठ्ठल मंदिर उभारले आहे. मंदिरात भाविकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी सराकरपर्यंत पोहचल्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विठ्ठल आणि रुक्मिणी मंदीराचा ताबा घेतला. त्यामुळे बडवे-उत्पात आणि सेवाधीर यांचे हक्क आणि अधिकार संपुष्टात आले. शासनाने मंदिर ताब्यात घेऊन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींनी २७ वर्षे लढा दिला होता.

देवाची परंपरागत पूजा करणाऱ्या बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींच्या हक्कांवर कोर्टाने गदा आणली. त्यामुळे बडवे आणि उत्पात मंडळींनी देवाच्या प्रति असलेली भक्ती अन् रूढी-परंपरा जतन करण्यासाठी विठ्ठल-रखुमाईचे स्वतंत्र मंदिर उभारणीचे काम हाती घेतले होते. आज त्याच विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पंढरपुरात आता दोन विठ्ठल मंदिरं झाल्याने भाविकांनी, वारकऱ्यांनी आणि तमाम भक्तांनी कोणत्या विठ्ठलाकडे गाऱ्हाणं मांडायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.