‘कोरोना’वर डॉ. फॉसी यांनी दिला मोठा इशारा, म्हणाले – ‘होऊ शकते 1918 सारखी परिस्थिती’

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेचे वरिष्ठ संसर्ग रोग शास्त्रज्ञ डॉ. अंथोनी फॉसी यांनी इशारा दिला आहे की, जर जगभरात योग्य पद्धत अवलंबली गेली नाही, तर कोरोना व्हायरस 1918 मध्ये पसरलेल्या महामारी प्रमाणे गंभीर रूप घेईल. जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ग्लोबल हेल्थ इनिशिएटिव्ह वेबीनारमध्ये डॉ. फॉसी बोलत होते.

डॉ. फॉसी म्हणाले, 1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू महामारीमुळे 5 ते 10 कोटी लोकांचा जीव गेला होता. ही जगातील सर्वात भयंकर महामारी होती. मी अपेक्षा करतो की, अशी स्थिती कोरोनामुळे येऊ नये, परंतु त्याने सुरूवात केली आहे.

जगभरातील देशांचा बेजबाबदारपणा आणि मानवी स्वभाव या आजाराला आणखी गंभीर बनवत आहे. मात्र, डॉ. अंथोनी फॉसी यांनी हा विश्वास व्यक्त केला की, एक दिवस ती औषधे हा आजार रोखण्यात यशस्वी होतील, ज्यांची सध्या ट्रायल सुरू आहे.

डॉ. अंथोनी फॉसी यांच्यासह वेबीनारमध्ये सहभागी सेंटर फॉर डिजीस कंट्रोल (सीडीसी) चे डायरेक्टर डॉ. रॉबर्ट रेडफील्ड यांनी म्हटले की, अमेरिकामध्ये 34 लाखपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही संख्या आणखी जास्त होऊ शकते. कारण लोकांची तपासणी होत नाही.

डॉ. रेडफील्ड यांनी जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनचा संदर्भ देऊन म्हटले की, जर कोणतेही औषध यशस्वी झाले नाही तर कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आपल्याला 2 ते 3 वर्ष लागतील. परंतु, यापेक्षा भयंकर गोष्ट ही आहे की, 2021 च्या सुरूवातीचे चार महिने लोकांसाठी खुपच कठीण जाणार आहेत.

जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीनुसार सध्या जगभरात 1.35 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत. सर्वात जास्त 34.95 लाख संक्रमित लोक अमेरिकेत आहेत. अमेरिकेतच सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. येथे 1.37 लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

हैराण करणारी बाब म्हणजे अनेक देशांना मागे टाकत भारत सर्वात जास्त आजारी लोकांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. अमेरिकानंतर 19.66 लाख आजारी लोकांसह ब्राझील दुसर्‍या आणि 9.36 लाख संक्रमित लोकांसह भारत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे.