राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यात होणार ‘अँटी बॉडी’ची तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेने (एनआयव्ही) विकसित केलेल्या इलायझा चाचणी कीटद्वारे राज्यातील ६ जिल्ह्यांमधील ४०० जणांच्या रक्तातील अँटी बॉडीची तपासणी केली जाणार आहे. सांगली, परभणी, जळगाव, बीड, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.

कोणत्याही विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शरीरामध्ये औषधोपचार किंवा शरीरातील प्रतिकारशक्तीमुळे या अँटी बॉडी विकसित होतात. त्याची तपासणी करणारे इलायझा हे चाचणी कीट एनआयव्ही ने काही दिवसांपूर्वीच विकसित केले आहे.

राष्ट्रीय पातळीवर प्रथमच शास्त्रज्ञांनी हे कीट तयार केले आहे. या कीटच्या उत्पादनासाठी आयसीएमआर कडून खासगी कंपनीशी करारही करण्यात आला असून त्यानुसार कीटची निर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे आता २१ मेपासून चाचण्या सुरु होणार आहे.

अँटी बॉडी चाचणीसाठी आयसीएमआरने देशातील २१ राज्यातील ६९ जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांमध्ये चाचणीच्या माध्यमातून कोरोनाच्या व्याप्तीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. निवड केलेल्या जिल्ह्यातील रॅन्डम पद्धतीने ठिकाणानुसार १० समुहामध्ये ४० जणांची अशी एकूण ४०० जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून संबंधित व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे का, अँटी बॉडी विकरित झाल्या होत्या का, प्रतिकारशक्ती आदी बाबींचा अभ्यास केला जाणार आहे.