दिल्लीत पुन्हा हिंसाचार ! आंदोलकांनी 3 बस फोडत पोलिसांवर केली दगडफेक (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात दिल्लीमध्ये ऐन थंडीत वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सीलमपूर भागात झालेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली आणि तीन बसेस फोडल्या यामुळे मोठी हिंसाचाराची परिस्थिती तयार झाल्याचे आढळून आले.

नागरी सुधारणा कायद्याविरोधात सीलमपूर येथून आंदोलनकर्त्यांनी मार्च काढला होता त्यानंतर जाफराबामध्ये हा मार्च आला असता मोठा हिंसाचार सुरु झाला ज्यामध्ये आंदोलनर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस देखील जखमी झाले. आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी यावेळी अश्रुधुराचा वापर देखील केला.

आंदोलन कर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आणि हिसंक वळण लागल्यामुळे दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली. वेलकम, जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, सीलमपूर आणि गोकुलपूर ही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीतील जामिया मीलीया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात हिंसाचार उसळला होता. याबाबत पोलिसांनी आज दहा जणांना अटक केली. विशेष म्हणजे अटक व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नाही. तसेच त्यातील तीन जनांवर आधी देखील गुन्हे दाखल आहेत.

ईशान्येकडे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. आसामधील कर्फ्यू देखील उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १३६ जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच १९० आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध संघटनेच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

देशभरातून नागरी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. हैद्राबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळूर चेन्नई मुंबई अशा ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला.

नागरी सुधारणा कायद्यविरोधात देशभर आंदोलने सुरु आहेत. प्रत्येक स्तरांवरून याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/