PoK मधील नागरिकांचा चीनविरोधात ‘संताप’, दिल्या ‘ड्रॅगन’च्या विरोधात घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद शहरात चीन आणि पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. निलम आणि झेलम नदीवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या धरणांच्या बांधकामाविरोधात हे निदर्शन करण्यात आले. लोकांनी रस्त्यावर उतरुन रॅली काढत हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बांधकामाचा निषेध केला.

आंदोलनादरम्यान पाकिस्तान आणी चीनकडून सुरु असलेल्या या बांधकामामुळे निसर्गावर होणार्‍या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले. जागतिक पातळीवर हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. कोणत्या कायद्याखाली पाकिस्तान आणि चीनकडून या वादग्रस्त जमिनीवर बांधकाम केले जात आहे अशी विचारणा आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पाकिस्तान आणि चीनकडून या नदींचा ताबा घेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप आहे. चिनी कंपनी आणि पाकिस्तान आणि चीनच्या सरकारदरम्यान कोहला येथे 1125 मेगावॅट हायड्रो पावर प्रोजेक्ट उभारण्यासाठी करार झाला आहे.