5 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार खासगी व्यक्‍तीसह अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारवाई न करण्यासाठी 15 हजाराच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच खासगी व्यक्‍तीमार्फत घेणारा पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पोलिस हवालदार आणि खासगी व्यक्‍तीला रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

निसार मेहमुद खान (44, बक्‍कल नं. 2647) आणि खासगी व्यक्‍ती मेहंदि अजगर शेख (32, रा. हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे सर्व्हे नं. 108/109 आनंदनगर (हडपसर परिसर) येथे भंगारचा व्यवसाय आहे. तक्रारदार महिलेने चोरीचा माल खरेदी केल्याचा आरोप करून पोलिस हवालदार निसार खान यांनी तिला यापुढे व्यवसाय करावयाचा झाल्यास आणि आता कारवाई न करावयाची झाल्यास 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 5 हजार रूपयाची लाच घेण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदार महिलेने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला असता तक्रारदार महिलेकडून आरोपी पोलिस हवालदार निसार खान यांच्या सांगण्यावरून मेहंदि शेखने सरकारी पंचासमक्ष 5 हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक राजु चव्हाण, चंद्रकांत चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक ढवणे, पोलिस हवालदार शेळके, पोलिस नाईक झगडे आणि चालक वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस हवालदार खान आणि खासगी व्यक्‍ती शेख यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते.