चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, पती किशोर वाघ यांच्याविरूध्द ‘या’ आरोपाखाली गुन्हा दाखल; राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपची सत्ता असताना चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांचे पती किशोर वाघ यांना 4 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आता बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पूजा चव्हाण हिच्या मृत्यु प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आवाज उठवत आहेत. किशोर वाघ यांना 2016 मध्ये 4 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची तपासणी सुरु करण्यात आली होती. काही दिवसांनी खुल्या चौकशीला सुरुवात झाली होती. चित्रा वाघ यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी आपल्या पतीला वाचविण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात होते.

मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडी सरकार सत्तेवर आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची ही चौकशी तशीच पुढे सुरु राहिली. याप्रकरणी तपास अधिकारी जगताप यांनी 12 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे. या चौकशीत किशोर वाघ यांची मुंबई, पुणे, नाशिक येथे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे तपासातून उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी आवाज उठवत असल्याने हा गुन्हा दाखल झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

किशोर वाघ हे परेल येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कामाला होते. ५ जुलै २०१६ मध्ये वाघ व इतर दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते़.त्यानंतर त्यांच्या घरी झडती घेण्यात आली़ तेव्हापासून ते आजपर्यंत निलंबित आहेत.

किशोर वाघ यांना १ डिसेंबर २००६ ते ५ जुलै २०१६ दरम्यान सेवा काळात मिळालेले उत्पन्न १ कोटी १४ लाख ६४ हजार ९४० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी उत्पन्नापेक्षा अधिक म्हणजे एकूण १ कोटी २५ लाख ८ हजार ३८५ रुपये खर्च केला आहे. त्यांच्या उत्पन्नाहून १० लाख ४३ हजार ४४५ रुपयांची अधिक रक्कम तसेच २ कोटी १८ लाख ११ हजार ६०३ रुपये इतक्या रक्कमेची मालमत्ता बाळगली आहे. त्यांचे उत्पनांच्या ९०.२४ टक्के अधिक अपसंपदा बाळगल्याचे आढळून आले आहे.