वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी ४०० रुपयाची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी ४०० रुपयाची लाच स्विकारणाऱ्या पुणे वाहतूक शाखेच्या चतुश्रृंगी विभागातील पोलीस कर्मचाऱ्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज (मंगळवार) सेनापती बापट चौकात करण्यात आली.

चंद्रकांत माणिक रासकर (वय-३८ रा शिवाजीनगर पोलीस लाईन Aब्लॉक रूम.नं.68 पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

चंद्रकांत रासकर हे चतुश्रृंगी वाहतूक विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत.

सेनापती बापट चौकामध्ये कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी विद्यार्थ्यावर कारवाई केली. विद्यार्थ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ताब्यात घेऊन ते सस्पेंड करण्याची भिती विद्यार्थ्याला दिली. लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी रासकर याने ५०० रुपये लाच मागतीली. तडजोडीमध्ये ४०० रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याची तक्रार विद्यार्थ्यांने पुणे लाचलुचपत विभागाकडे केली.

पथकाने पडताळणी करुन सेनापती बापट चौकामध्ये सापळा रचला. विद्यार्थ्याकडून लाच स्विकारताना रासकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. रासकर विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप अधिक्षाक दत्तात्रय भापकर करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.